नागपूर - असं म्हणतात की माणूस जिवंत असेपर्यंत त्याची सावली कधीही साथ सोडत नाही, हे खरं जरी असले तरी आज काही काळ सावलीने नागपूरकरांची साथ सोडली होती. दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी अचानक सावली कुठे गेली असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र आज झिरो शॅडो डे म्हणजेच शून्य छाया दिवस असल्याने हा चमत्कार घडला. नागपूर येथील प्रसिध्द रमण विज्ञान केंद्रात शून्य सावलीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विविध आकारांच्या वस्तुंच्या माध्यमातू ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
आपली पृथ्वी तिरप्या अक्साने स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीच्या या भ्रमणानुसार सूर्य सध्या उत्तरेकडे प्रवास करत आहे. यालाच उत्तरायण म्हणतात. कर्कवृत्तापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा त्याचा प्रवास दक्षिणेकडे सुरू होतो म्हणजेच दक्षिणायन प्रारंभ होते. तज्ज्ञांच्यानुसार पृथ्वीचा धुव्र २३.५ अंश उत्तरेकडे कलल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. त्यामुळे सूर्य हा विषुववृत्तपासून दक्षिणेकडे २३.५ अंश आणि उत्तरेकडे २३.५ अंश भ्रमण करताना दिसतो. यादरम्यान सूर्य ज्या अक्षांशावरून प्रवास करतो त्या अक्षांशावरील गाव व शहरांमध्ये तो दुपारी काही क्षणांसाठी (मिनिटभर) डोक्यावर म्हणजे खऱ्या अर्थाने मध्यबिंदूवर येतो. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली, असे वाटते. या खगोलीय घटनेचा रोमांचकारी अनुभव नागपूरकरांनी आज घेतला. नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात झिरो शॅडो डे निमित्ताने विशेष आयोजन करण्यात आले होते.
वर्षातून दोनदा येतो झिरो शॅडो डे
वर्षातून दोन वेळा झिरो शॅडो डे अनुभवायला मिळतो, पण एक वेळा हा दिवस पावसाळ्यात येत असल्याने अनुभवणे शक्य होत नाही. ३० मेपर्यंत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असाच शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.
हेही वाचा - पालखी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक