नागपूर - शहरात गुन्हेगारीचा एक अजबच प्रकार समोर आला आहे. तीन दिवसापूर्वी एका दूध विक्रेत्याला बंदुकीचा धाक दाखवून १० लिटर दूध लुटल्याची घटना घडली होती. त्या घटनेतील आरोपींना अजनी पोलिसांनी शोधून काढले आहे. या प्रकरणाच्या तपासात लुटीचे कारण मात्र, अत्यंत हास्यास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ भूक लागली म्हणून तिघा भामट्यांनी दुधाची चोरी केल्याचे कारण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लुटीच्या आरोपाखाली तिघा भामट्यांना अटक केली आहे.
या घटनेबाबतची सविस्तर माहिती अशी आहे, नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन जवळच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय दूध योजनेचा एक विक्री स्टॉल आहे. त्या स्टॉलवर ६० वर्षांचे रामकृष्ण शेळके नावाचे वृद्ध कामाला आहेत. पहाटे चार वाजता रामकृष्ण त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमानुसार दुधाच्या गाडीतून कॅरेट खाली उतरवित होते. त्यावेळी एका अॅक्टिव्हा वरून (क्रमांक ८३४०) तीन तरुण तिथे आले आणि आपापसात बोलताना त्यांनी "निकाल रे अपनी बंदूक अभी एक का गेम बजाए है! इसका भी गेम बजाते है!" असे संभाषण सुरू केले. तेवढ्यात एकाने खिशातून बंदूक काढण्याचा बनाव करत रामकृष्ण यांच्याकडे धाव घेतली. ६० वर्षीय वृद्ध रामकृष्ण त्यामुळे घाबरून गेले. रामकृष्ण घाबरलेले पाहुण या तिघा भामट्यांनी लगेच दुधाच्या स्टॉल वरून १० लिटर दुधाच्या पिशव्या उचलून घेत घटनास्थळावरून पळ काढला. त्यावेळी रामकृष्ण यांनी त्यांच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला.
या तिघा भामट्यांनी दुधाची चोरी करताना कोणाला इजा केली नाही. एवढेच नाहीतर आश्चर्यकारक बाब म्हणजे स्टॉलवर दुधाच्या खरेदीसाठीचे हजारो रुपये कॅश बॉक्समध्ये ठेवले होते. त्यालाही त्यांनी हात लावला नाही. त्या तिघांनी फक्त १० लिटर दुधासह घटना स्थळावरून पळ काढला. केवळ भूक लागली म्हणून या तिघांनी दूध चोरी केल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे.
घाबरलेल्या रामकृष्ण यांनी घटनेची तक्रार पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या लुटीची सविस्तर माहिती घेऊन पुढील तपास सुरू केला. या घटनेत वृद्ध माणसाकडे हजारो रुपये असताना बंदूक घेऊन आलेले लुटारू ती रोकड न लुटुन न जाता फक्त १० लिटर दूध घेऊन का गेले, या विचाराने पोलीस ही चक्रावले. तसेच या लुटीत तथाकथित लुटारूंनी बंदुकीचा वापर केला असल्याची तक्रार आली असल्याने पुढे आणखी काही गुन्हा घडू नये, हे लक्षात घेत पोलिसांनी गंभीर्याने या अजबगजब घटनेचा तपास वेगाने सुरू केला.
चारशे रुपयांच्या दुधाच्या या लुटीच्या घटनेबद्दल एकच धागा पोलिसांकडे होता आणि तो म्हणजे लूट झालेल्या स्टॉलचे कर्मचारी रामकृष्ण शेळके यांनी अॅक्टिव्हाचे ८३४० असे अखेरचे फक्त चारच नंबर पाहिले होते. त्यामुळे पोलिसांनी आरटीओ कडून नागपुरात अस्तित्वात असलेल्या ८३४० या क्रमांकाच्या सर्व अॅक्टिव्हा किंवा तत्सम गाड्यांची यादी मागितली. आरटीओ ने वेगवेगळ्या सिरीजमध्ये ५० पेक्षा जास्त दुचाकींचे नंबर ८३४० असल्याची यादी दिली. पोलिसांनी त्या यादीप्रमाणे ८३४० या क्रमांकाच्या प्रत्येक गाडी मालकाला शोधून विचारपूस सुरू केली. मात्र, दुधाच्या लुटीमागचा खरं कारण आणि खरे आरोपी काही समोर येत नव्हते. तीन दिवस शोध घेतल्यानंतर अखेरीस पोलीस अभिजित ढोके, गौरव पांडे आणि कुशल सरणकर यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांना थोडा पोलिसी खाक्या दाखविला आणि हे तरुण पोपटासारखे बोलू लागले.
म्हणून केली चोरी...
तिघांचे कोणतेही गुन्हेगारीचे जुने रिकॉर्ड नाही. त्यामुळे बंदुकीचा धाक दाखवत १० लिटर दुधाची लूट का केली, अशी विचारणा जेव्हा पोलिसांनी केली. तेव्हा अत्यंत हास्यास्पद कारण या तिघांनी पोलिसांना सांगितला. पहाटे अचानक लवकरच झोप उघडली... जोरात भूक लागली होती. एवढ्या सकाळी घरचे नास्था बनवून देणार नव्हते. तसेच एवढ्या पहाटे दुधाचे स्टॉल वगळून दुसरे काहीच उघडे नसल्यामुळे दूध पिण्याकरिता दूध लुटून नेल्याचे कारण तिन्ही तरुणांनी पुढे केले. तिघांनी जी बंदूक काढण्याचे बनाव करत दुधाची लूट केली होती, ती बंदूक ही बनावट निघाली आहे. पोलिसांनी तिघांना लुटीच्या प्रकरणात अटक केली असून भूक लागली म्हणून लूट करणारे हे तिघे तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.