नागपूर - उपराजधानीतील आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती दडवून ठेवल्यामुळे नागपूरमध्ये अचानक ७ हजार ३०० रुग्णांची अनपेक्षित वाढ दिसत आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे तर, मृतांचा आकडासुद्धा २७५ने वाढला आहे. नागपुरातील एकूण मृतांची संख्या ३ हजार ४१० इतकी झाली आहे. आयसीएमआरकडून एकूण रुग्णांची नवीन आकडेवारी दिली गेल्यानंतर आकड्यांचा हा घोळ समोर आला आहे. या संदर्भात महानगरपालिका खासगी पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कोणती कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अचानक कशी झाली वाढ -
जिल्हा माहिती कार्यालयाकडून रोज जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा दिला जातो. काल दिलेल्या माहितीमध्ये मृतांच्या संख्येत अचानक २७५ ने वाढ दर्शवण्यात आली. तर, एकूण रुग्णांच्या संख्येतसुद्धा ७ हजार ३५७ रुग्णांची वाढ दिसली. विशेष म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील ७ हजार ७ ने वाढली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची नेमकी संख्या किती? यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. त्यांनंतर महानगरपालिकेकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून वेळेत माहिती पुढे आली नसल्याचे कारण महानगरपालिकेने दिली आहे.
या अगोदरही झाला होता असाच घोळ -
गेल्या महिन्यात सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांचा असाच घोळ पुढे आला होता. तेव्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजाराने वाढली होती. त्यावेळी पॅथॉलॉजी लॅब्सनी रुग्णांची माहिती ऑनलाइन पद्धतीने आयसीएमआरला कळवणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यावेळी आकड्यांमध्ये तफावत आढळून आल्याने ध्रुव पॅथॉलॉजी लॅबला पाच लाख रुपयांचा दंड लावण्यात आला होता. इतर काही लॅबला समज देण्यात आली होती.