नागपूर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिमाण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या काळात नागपुरातील आयटी तज्ञ विक्रम लाभे यांनी कोट्यवधीचा फायदा मिळवला आहे. लाभे यांच्या स्टार्टअप आयटी कंपनी 'फाईव्हट्रन' मध्ये लॉकडाऊनच्या काळात तब्बल ७५० कोटींची परकीय गुंतवणूक झाली आहे. अमेरिकेतील अँडरसन हॉवर्डस नावाच्या मोठ्या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. त्यामुळे विक्रम लाभे यांच्या कंपनीचे कौतुक होत आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. अनेक जणांची नोकरी जात आहे. नागपुरातील विक्रम लाभे या आयटी तज्ञाला त्याच्या स्टार्टअपच्या माध्यमातून कोट्यावधीचा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. मूळचे नागपूरकर आणि पदवीनंतर अनेक वर्षे कॅनडा आणि अमेरिकेतील विविध आयटी क्षेत्रात काम करणारे विक्रम लाभे सध्या बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात काम करतात.
भारतात आल्यानंतर त्यांनी 'फाईव्हट्रन' नावाची स्टार्टअप आयटी कंपनी सुरू केली. या कंपनीने उभारणीच्या काही काळातच मोठी झेप घेतली आहे. फाईव्हट्रन प्रामुख्याने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑटोमेटेड डेटा इंटिग्रेशनचे काम करते. ग्राहकांना लागणारा मोठ्या प्रमाणावरील डेटा गोळा करून ते हव्या त्या स्वरूपात वर्गीकृत करून देण्याचे काम फाईव्हट्रन या कंपनीच्या माध्यमातून केले जाते. सध्या जागतिक पातळीवर विविध कंपन्या कोरोनामुळे त्यांच्या कार्यालयातून कर्मचाऱ्यांना काम करण्याऐवजी शक्य असल्यास त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे यावर भर देत आहेत. त्यामुळेच ऑटोमेटेड डेटा इंटिग्रेशनचे काम करणाऱ्या फाईव्हट्रनसाठी कोरोनाच्या संकटाच्या काळात ही नवी व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे.
ग्राहकांना लागणारा डेटा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे काम विक्रम लाभे यांची फाईव्हट्रन करत आहे. विक्रम लाभे यांनी भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय तरुणांना सोबत घेऊन काही नाविण्यपूर्ण करण्याचे ठरवले होते. त्यानुसारच अमेरिकेतील त्यांच्या मित्रांच्या मदतीने त्यांनी भारतात एका खोलीतून 'फाईव्हट्रन' ही आयटी कंपनी सुरू केली. एका खोलीतून सुरु झालेली फाईव्हट्रन आज बंगळुरूमध्ये १ हजार कर्मचाऱ्यांसह एका मोठ्या आयटी कंपनीपर्यंत पोहोचली आहे. या कंपनीचे बंगळुरू शिवाय हैदराबाद आणि मुंबईतही कार्यालय आहे.
लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना वाढीस लागल्याने फाईव्हट्रनला चांगले दिवस आले आहे. अँडरसन हॉवर्डसच्या ७५० कोटींच्या गुंतवणुकीतून फाईव्हट्रन जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास विक्रम लाभे यांनी व्यक्त केला आहे. सध्या विक्रम लाभे नागपूरमध्ये असून इथूनच कंपनीचे काम सांभाळत आहेत.
विशेष म्हणजे लाभे यांनी आजवर फाईव्हट्रनमध्ये वैदर्भीय आणि महाराष्ट्रातील तरुणांना संधी दिली आहे. आता मोठ्या गुंतवणुकीनंतर कंपनीच्या विस्तारात पुन्हा वैदर्भीय आणि महाराष्ट्रातल्या आयटी अभियंत्यांना संधी देण्याचे त्यांनी ठरविले आहे. शिवाय आयटी क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या आणि स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींनी या क्षेत्रात यावे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे क्षेत्र उत्तम आहे, असेही लाभे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आयटी क्षेत्रात कामाची सुरुवात करू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे विक्रम लाभे यांनी सांगितले.