नागपूर - आज(सोमवार)पासून नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संचारबंदीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाकडून सलग तीन आठवडे शनिवार आणि रविवार विकेंड कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बेजबाबदार नागपूरकरांनी विकेंड कर्फ्युला ठेंगा दाखवला. त्यामुळे आजपासून पुढील सात दिवस नागपुरात कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यानुसार संचार बंदीला सुरुवात झाली आहे. शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात शंभर ठिकाणी नाकेबंदी केली आहे. मात्र, तरीही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे.
१५ मार्चपासून सुरू होत असलेल्या संचारबंदी दरम्यान वाहनचालकांसाठी पोलीस विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दुचाकीवरून केवळ एकच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. तर, कारमध्ये दोघांना प्रवास करण्याची परवानगी पोलीस विभागाने दिली आहे.
शहराची सीमा सील केली जाणार -
संचारबंदी दरम्यान शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौका-चौकात पोलिसांकडून बेजबाबदार नागरीकांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय शहराची सीमादेखील सील करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या दरम्यान शहरात तब्बल १०० ठिकाणी नाका बंदी लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
लसीकरण राहणार सुरू -
कोरोनाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने शहरात १५ ते २१ मार्च दरम्यान कडक कर्फ्यू लावण्यात आला आहे. या काळात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी पोलीस यंत्रणा मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काय राहिल सुरू आणि काय बंद -
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान शहरात लॉकडाऊन लावण्याची घोषणा केल्यानंतर या काळात शहरात कोणत्या सुविधा सुरू राहतील या संदर्भात माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये रुग्णालयात, औषधांचे दुकान, डोळ्यांचे दवाखाने, चष्म्यांचे दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय शहरातील काही उद्योग सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. भाजीची दुकाने सुरू राहतील. थेट दुकानांमध्ये दारू विक्री होणार नाही. मात्र, ऑनलाइन मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मास विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. शहरातील खासगी कार्यालय मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.