नागपूर - सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा लढा सुरु करून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. सावित्रीबाईंनी सुरु केलेला महिला अधिकारांचा लढा आजही सुरूच आहे. अनेक सावित्री आजही वेगवेगळ्या रुपात महिलांच्या अधिकारांसाठी कार्यरत आहेत. यापैकीच एक आहेत नागपूरच्या डॉक्टर रुपा कुलकर्णी. असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी डॉ. कुलकर्णी यांनी लढा दिला. त्यांनी २८ वर्षांच्या लढ्यानंतर देशात पहिल्यांदा २००८ ला महाराष्ट्रात 'घरेलू कामगार कायदा' लागू झाला.
असंघटीत कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणी हा खूप मोठा वर्ग आहे. मात्र, संघटीत नसल्याने त्यांना त्यांच्या हक्कांविषयी पुसटशी कल्पनाही नव्हती. १९८०ला डॉक्टर रुपा कुलकर्णी यांनी या मोलकरणींना संघटित करून त्यांना अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरु केला. 28 वर्षांच्या अखंड लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी कायदा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून राज्यात तब्बल १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात आली.
हेही वाचा - सावित्रीबाईंना शेण, दगड मारले होते; पण १८४८ साली त्यांच्या पहिल्याच शाळेत होत्या ४५ मुली
मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात २७ एप्रिल १९४५ ला रुपा कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव हे शिक्षक होते तर आई प्रमिला या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. सहाव्या वर्षी कुटुंबासह रूपा या नागपुरात वास्तव्यास आल्या. संस्कृत भाषेत एमए आणि पीएचडी प्राप्त केल्यानंतर त्यंनी प्राध्यापिका म्हणून कार्य केले. २००५ ला त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या.
रुपा कुलकर्णी यांचा बौद्ध धम्म व आंबेडकरी विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ला बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. २००८ ला मोलकरणींसाठी कायदा तयार करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या रुपा कुलकर्णी यांचा लढा आजही सुरूच आहे. २०१४ ला राज्य सरकारने मोलकरणींसाठी अस्तित्वात असलेला बोर्ड बरखास्त केला. हा बोर्ड पुन्हा अस्तित्वात यावा याकरता त्या प्रयत्नशील आहेत. रुपा कुलकर्णी यांची विविध विषयांवरील १० पुस्तके प्रकशित झाली आहेत. केवळ घरकाम करणाऱ्या मोलकरणीच नाही तर अनेक सामाजिक कार्य व आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
घरेलू कामगार कायद्यामुळे मिळालेल्या सुविधा
-
पहिल्यांदाच मोलकरणींची नोंदणी करण्यात आली
. मोलकरणींच्या मुलांना शिष्यवृत्ती
, मोलकरणींना प्रसूती रजा
मोलकरणीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च बोर्ड देणार,
मोलकरणींना आजारपणी रजा
, एकूण ३५ कामांचा घरकामांमध्ये समावेश