नागपूर - येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता राजकीय पक्ष रणांगणात उतरत आहेत. अशात रक्षाबंधनाचे औचित्य साधून नागरिकांना पक्षासोबत जोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर शहरातून दोन लाख राख्या पाठविणार असल्याची माहिती भाजप महिला मोर्चाने दिली आहे.
शहरातील प्रत्येक बुथवरून शंभर राख्या म्हणजेच एका विधानसभा मतदारसंघातून सुमारे ३५ हजार राख्या पाठविण्यात येणार आहेत. यासाठी भाजपच्या महिला पदाधिकारी या घरोघरी जाऊन महिलांकडून राखी घेणार आहेत. तसेच या माध्यमातून सदस्य नोंदविण्याची प्रक्रिया देखील पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीकरिता भाजपने प्रचारासाठी राखीचा धागा पुढे केल्याचे दिसतेय.
भाऊ म्हणून राखी बांधणाऱ्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, असे भाजप महिला अध्यक्षा कीर्तिदा अजमेरा आणि सरचिटणीस अर्चना देहणकार यांनी सांगितले