नागपूर : शहरातील सीताबर्डी पोलिसांना ॲपल कंपनीच्या नावावर बनावट इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. काही दुकानदार ॲपल कंपनीचे मोबाईल, चार्जर ॲडाप्टर, युएसबी केबल, एअर पॉड, मॅकबुक, आयपॅड, मोबाइल कव्हर इत्यादींची विक्री होत होते. त्या अनुषंगानं पोलिसांनी ॲपल कंपनीला सूचना दिल्यानंतर ॲपल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन धाड (Police Raid On Mobile Shop) टाकली. यात पोलिसांनी 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बनावट वस्तूंची विक्री : पोलिसांनी चार दुकानांवर धाड टाकण्यापूर्वी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोबाईल शॉपीच्या मालकांनी सर्व बनावट वस्तूंची साठेबाजी केली होती. त्यानंतर चढ्या भावानं वस्तू विकत असल्याचं तपासात उघड झालं आहे. भूषण राधाकिशन गेहानी या दुकानातून 43 लाख 47 हजार 100 रुपये किंमतीच्या बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तर, मनोज रमेशलाल धनराजानी यांच्या दुकानातून 14 लाख 78 हजार 600 रूपये किंमतीचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच साहील विनोदकुमार बजाजच्या शॉपमधून 23 लाख 43 हजार रूपये किंमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल : उत्पादनाची हुबेहुब नक्कल करून आरोपींनी 87 लाख 59 हजार किंमतीच्या वस्तूंचं बनावटीकरण तसंच साठेबाजी केली होती. त्यामुळं आरोपींवर 572 / 23 कलम 51, 63 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इन्स्टाग्रामवर वस्तूंची विक्री : इंस्टाग्रामसह सोशल मीडियाच्या माध्यमातून अँपल कंपनीच्या बनावट वस्तूंची विक्री सुरू होती. या बाबतीत एका तक्रार मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी गिट्टीखदान परिसरात धाड टाकून 10 लाख रुपये किमतीच्या बनावट वस्तू जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे सर्व वस्तू बनावट असताना देखील शेकडो ग्राहक या वस्तू घेण्यासाठी गर्दी करत होते. सायबर पोलिसांनी एकाला या प्रकरणात अटक केली आहे.
हेही वाचा