नागपूर - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी तपस घोष नावाच्या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात आरोपी तपस घोष यांची पत्नी देखील सहभागी असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तिला देखील अटक होण्याची शक्यता आहे.
आरोपीला आहे त्याच्या पत्नीची साथ?
नागपूरमध्ये बोबडे यांच्या मालकीचे 'सिजन लॉन' आहे. शरद बोबडे यांच्या मातोश्री मुक्ता बोबडे (वय ९४) यांनी सध्या हिशोबात लक्ष घालणे सोडून दिले आहे. याचा गैरफायदा घेत तपस घोष याने त्यांची अडीच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तपश घोष हा लॉनचा केअर टेकर आणि व्यवस्थापक म्हणून काम करायचा. त्याला ९ हजार रुपये महिना आणि प्रत्येक बुकिंग वर २ हजार ५०० रुपये कमिशन दिले जाई. मात्र, आरोपीने खोट्या पावत्या तयार करून मुक्ता बोबडे यांची आर्थिक फसवणूक केली. त्याच्या सोबतीला त्याची पत्नी सुद्धा असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केलेला आहे.
अशी केली फसवणूक -
आरोपी तपस घोष हा १३ वर्षांपासून बोबडे कुटुंबाकडे कामाला आहे. या काळात त्याने बुकींचे पैसे लंपास करत अडीच कोटी रुपये गहाळ केल्याचे उघड झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात लग्न समारंभासह सर्वच कार्यक्रम रद्द झाल्यानंतर ग्राहकांनीही बुकिंग्स रद्द केल्या. त्यांनी भरलेले पैसे परत मागितले. तेव्हा ग्राहकांना पैसे परत देण्याच्या नावावर आरोपीने मुक्ता बोबडे यांच्या खात्यातील पैसे देखील काढल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण ?
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबियांच्या वडिलोपार्जित स्थावर जमिनीवर दहा वर्षांपूर्वी 'सिजन लॉन' तयार करण्यात आले आहे. या लॉनची देखभाल आणि इतर कामांसाठी तपस घोष नावाच्या व्यक्तीची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती कारण्यात आली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई वृद्ध आणि आजारी असल्याने त्या या व्यवहाराकडे लक्ष देऊ शकत नाहीत. याचा घोष याने गैरफायदा घेऊन हिशोबात घोळ करण्यास सुरुवात केली. न्यायाधीश शरद बोबडे हे देखील व्यस्त असल्याने त्यांनी घोष वर विश्वास ठेवला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घोषने केलेला घोळ लक्षात आल्यानंतर बोबडे कुटुंबाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात घोषने लॉनच्या भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेच्या बनावट पावत्या तयारकरून हेराफेरी केल्याचे उघड झाली. काल (बुधवारी) रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.