नागपूर - पहिल्यांदा चोरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केल्यानंतर तोच ट्रक दुसऱ्यांदा पोलिसांच्या ताब्यातून चोरण्याचे धाडस करणाऱ्या चोरट्याला नागपूर शहरातील लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नागपूर पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती, घटनेच्या काही तासांत पोलिसांनी आरोपीसह चोरलेला ट्रक जप्त केला आहे.
९ ऑक्टोबर रोजी सुमित पोद्दार या लोखंड व्यापाऱ्याचा २० टन लोखंड असलेला ट्रक लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पुष्करणा भवन समोरून चोरीला गेला होता. लाखोंचा मुद्देमाल भर रस्त्यातून चोरीला गेल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने १३ ऑक्टोबरला तो ट्रक मोर्शीवरून जप्त करून संजय ढोणे नावाच्या आरोपीला अटक केली. त्यानंतर तो जप्त केलेला ट्रक आणि आरोपी संजय ढोणे याला गुन्हे शाखा पोलिसांनी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले.
मात्र लकडगंज पोलिसांनी ट्रक आणि मुद्देमाल मूळ मालकाला परत दिला नव्हता, पोलिसांनी तो ट्रक पोलीस ठाण्याच्या समोर उभा केला होता. या दरम्यान आरोपी संजय ढोणे याला जामिनावर सोडण्यात आले, त्यावेळी हाच ट्रक पुन्हा चोरणार असल्याचे तो म्हणाला होता, मात्र त्याच्या बोलण्यावर कुणालाही विश्वास ठेवला नाही, मात्र दोन दिवसांपूर्वी आरोपी संजय ढोणे याने बोललेलं खरं करून दाखवत, चक्क पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रक चोरून नेत पोलिसांना आवाहन दिले.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी केली असताना, आरोपी हा कळमेश्वर येथे चोरीचे लोखंड विकण्यासाठी आला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, या माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी थेट कळमेश्वर गाठून ट्रक जप्त केला, मात्र आरोपी आढळून आला नव्हता. अखेर पोलिसांनी या आरोपीला काटोलमधून ताब्यात घेतले आहे.