नागपूर - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळ-जवळ आठवडा लोटला असला तरी मंत्र्यांना मंत्रालयाचे वाटप झाले नाही. याच कारणामुळे विरोधक टीका करत आहेत. यावर आता कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे, मोठे निर्णय घ्यायला थोडा वेळ लागणे सहाजिक असल्याचे त्यांनी म्हटले.
खातेवाटपाला उशीर लागत आहे. यात काही नवीन नाही, अशीच परिस्थिती 1992 मध्ये सुद्धा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. विचार विमर्ष करायला वेळ तर लागणारच. कोणत्या मंत्र्याला कोणते पद द्यायचे या संदर्भात काँग्रेस हायकामंडची परवानगी आली आहे, त्यानुसार ती यादी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आम्ही 3 खाती शिवसेनेकडून वाढवून घेतली आहेत.बंदरे व खारभूमी, क्रीडा आणि युवक कल्याण आणि सांस्कृतिक मंत्रालय हे काँग्रेसला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अब्दुल सत्तार प्रकरणावरसुद्धा त्यांनी भाष्य केले आहे. सत्तार हे शिवसेनेचे आहेत त्यांच्याबद्दल बोलणे योग्य होणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले नसल्याचेही सत्तार यांनी म्हटले आहे.