नागपूर - राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच बसवेन, असे वचन उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांना दिले होते. शिवसैनिक पालखीचे भोई होणार नाहीत, तर ते पालखीत बसतील, असेही ते म्हणत होते. मात्र, आता शिवसैनिकाला पालखीत न बसवता स्वतः पक्षप्रमुखच पालखीत बसायला निघाले, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
राज्यात मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळेच दोघांमध्ये फूट पडली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत जात महाविकासआघाडी स्थापन केली. आज उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. मात्र, त्यांचे ओझे पालखीत बसणाऱ्या भोयांना पेलणार आहे का? असाही खोचक सवाल करण्यात आला. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड केली होती. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करायला पाहिजे होते. मात्र, शिवसेनेला जाळ्यात फसवणाऱ्या अजित पवारांच्या काकांनी त्याला नकार दिला, असे म्हणत शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
हे वाचलं का? - महाविकास आघाडीत फक्त १ उपमुख्यमंत्री, 'असा' ठरलाय मंत्रिपदाचा फॉर्म्युला
भाजपने अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्यासाठी थोडी घाई केली. मात्र, त्यामुळे भाजपचे फार मोठे नुकसान झालेले नाही, असे म्हणत भाजपवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. तसेच अभद्र महाआघाडीचे सरकारमधील पोकळपणा लवकरच जनतेसमोर येणार असल्याचाही उल्लेख या अग्रलेखात करण्यात आला आहे.