नागपूर - विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे विसर्जन आज शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. बाप्पाला निरोप देताना नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. शहरातील केवळ फुटाळा तलावातच "श्री" चे विसर्जन करण्याची परवानगी असल्याने फुटाळा तलाव परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यावेळी ड्रोन कॅमेऱ्याने बाप्पाचे विसर्जन आणि भक्तांची मांदियाळी टिपण्यात आली.
'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', च्या जयघोषात आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. प्रशासनातर्फे शहरातील फुटाळा तलाव येथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची परवानगी देण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे अगदी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. तर जलप्रदूषण होऊ नये यासाठी अनेक सेवाभावी संस्था झटत होत्या. बाप्पाला निरोप देताना प्रत्येक गणेश भक्तांचा कंठ दाटून आला होता. यावेळी येथील सुंदर दृश्यांना ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे.
हेही वाचा- समाजातील दुःख घेऊन जा, नागपुरमधील महिलांचे बाप्पाला साकडे