नागपूर - शहराच्या मध्यभागी असलेल्या मध्यवर्ती कारागृहाला स्थानांतरीत करण्यात येणार आहे. कोराडी परिसरातील भोसला मिलिटरी स्कुलच्या शेजारी असलेल्या शासनाच्या १५० एकर जागेवर नवीन कारागृह तयार केले जाणार आहे. कैद्यांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूर-वर्धा मार्गावरील शहराच्या मध्यभागी असलेले आणि १५१ वर्ष जुने असलेले नागपूर मध्यवर्ती कारागृह हलवण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. १८६४ ला सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती कारागृह १३५ एकरात पसरलेले आहे. १३५ पैकी ३० एकर जागेवर बंदीवानांचे अधिवास आहेत, तर उर्वरित १०५ एकरात शेतीसह विविध उपक्रम राबवले जातात. १८४० कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहात २ हजार ३०० पेक्षा जास्त कैदी कोंबण्यात आलेले आहेत. यामध्ये २ हजार १८७ पुरुष कैदी, तर ७६ महिला बंदीवानही या कारागृहात कैद आहेत.
दिवसागणिक कैद्यांची संख्या वाढू लागल्याने मध्यवर्ती कारागृह अपुरे भरायला लागले आहे. त्यासाठी नवीन कारागृहासंदर्भात मागणी जोर धरू लागल्यानंतर शासनाने नागपूरच्या कोराडी परिसरातील बेल्लोरी-बाबूलखेड या भागातील १५० एकर जागा नवीन कारागृहासाठी निश्चित केली आहे. याठिकाणी लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली आहे.