नागपूर - महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर पथकाने रंगेहात अटक केली आहे. गजानन बळीराम डाबरे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, ते नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथे कार्यरत असून त्यांच्यावर एसीबीकडूनही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार इलेक्ट्रीक ठेकेदार आहेत.
तक्रारदाराने येथील ले-आउटमध्ये इलेक्ट्रीकच्या तीन एच.टी. लाइन स्थानांतरीत करण्याचे काम घेतले आहे. त्या तीनही एच.टी. लाइन त्यांनी स्थानांतरीत केल्यानंतर त्याबाबतचा रिपोर्ट तक्रारदार यांनी उपकार्यकारी अभियंत्याकडे सादर केला होता. त्यावेळी काम पूर्ण झाल्याच्या अहवालात कोणतीही त्रुटी न काढता तो अहवाल स्वीकारण्यासाठी उपकार्यकारी अभियंता गजानन डाबरे यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मगितली. मात्र, लाच का द्यायची म्हणून ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येऊन रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराने दिलेल्या माहितीची अत्यंत गोपनिय शहानिशा करून उपकार्यकारी अधिकारी गजानन डाबरे यांना रंगेहात अटक करण्यासाठी सापळा रचला. उपकार्यकारी अभियंता गजानन डाबरे यांनी त्यांच्या खापा येथील कार्यालयात ३० हजारांची रक्कम पंचासमोर स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली आहे.
आठ दिवसात तीन कारवाई
मधल्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या कारवाया कमी झाल्या होत्या. मात्र, आठ दिवसांत तीन कारवाया केल्याने एसीबीचे नागपूर पथक पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. एसीबीने केलेल्या तीन कारवायांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आशी नगरमध्ये कार्यरत कर संकलन अधिकाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्याला ३ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोराडी येथील मुख्याध्यापकासह लिपिकाल निवृत्त शिक्षकाकडून २० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. तर आता महावितरण कंपनीच्या उपकार्यकरी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर पथकाने रंगेहात अटक केली ही तिसरी कारवाई आहे.
हेही - 'पंतप्रधानांनी देशाला फक्त चीनी कचरा, चिंता आणि चिता दिल्या'