नागपूर - भारतीय जनता पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरात पक्षाला बंडाळीची झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारांची पाहिली यादी जाहीर झाल्यानंतर नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच संतप्त झाले आहेत. डान्सबारमध्ये सापडलेल्यांना उमेदवारी मिळते आणि एका सामान्या कार्यकर्त्याला जो कार्यकर्त्यांच्यातूनच समोर आला आहे, त्याला कसे डावलले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - युतीच्या नादात शिवसेनेची 'या' महत्त्वाच्या शहरांमध्ये झोळी रिकामीच
पक्षाने उमेदवारी नाकारताना त्या मागील कारणांचा खुलासा करणे गरजेचे होते. मात्र, कोणतेही कारण न सांगता पक्षाने माझ्यावर अविश्वास दाखवला आहे. हा माझा अपमान नसून दक्षिण नागपुरातील 3 लाख मतदारांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया कोहळेंनी दिली आहे. मतदारसंघात 600 कोटी रुपयांची विकास कामे केल्यानंतर सुद्धा मला तिकीट मिळाले नाही, यावरून विकास हरला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मित्र जिंकला, अशीच स्थिती असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाआघाडी, मनसेने बांधली मोट, एकत्र मिळून देणार उमेदवार
या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे, त्यानंतर कार्यकत्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे कोहळे यांनी सांगितले.