नागपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात दुधाची मागणीही घटली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने दूध उत्पादन शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांकडून हमीभावाने दूध खरेदी करणार आहे.
हेही वाचा- लढा कोरोनाविरुद्धचा : हिमाचल सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार
शेतकऱ्यांच्या दुधासाठी 25 रुपये लिटर हा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. या दुधापासून शासन दूध पावडर तयार करणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही शेतकऱ्याचे दूध वाया जाणार नाही, अशी हमी राज्याचे दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. खाजगी किंवा सहकारी संस्थेने हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही केदार यांनी सांगितले.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज सातवा दिवस आहे.