नागपूर - मुलाच्या प्रवेशानंतर सतीश चतुर्वेदी देखील शिवसेनेत जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. त्यामुळे चतुर्वेदी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुष्यंत चतुर्वेदीच्या शिवसेना प्रवेशामुळे नागपुरात सेनेला बळकटी मिळेल, अशी आशा सेनेला आहे. दुष्यंत यांना कुठलाही जनाधार नसला तरी निवडणुकीचे व्यवस्थापन करण्यामध्ये ते तरबेज आहे. त्यामुळे आता शिवसेना त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुष्यंत यांचे वडील सतीश चतुर्वेदी काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जायचे. पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे ते सध्या राजकीय परिस्थितीची चाचपणी करत आहेत. सध्या सतीश चतुर्वेदी हे नागपूरच्या राजकारणापासून दूरच आहेत. मात्र, अजूनही त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांवरची पकड घट्ट आहे. आघाडी सरकारमध्ये सतीश चतुर्वेदी ५ वेळा पूर्व नागपुरातून आमदार राहिले होते. ते राज्यात मंत्री देखील होते. मात्र, २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चतुर्वेदी राज्याच्या राजकारणात टिकाव धरू शकले नाहीत. त्यावेळी कृष्णा खोपडे यांच्याकडून सतीश चतुर्वेदी यांना पराभव पत्करावा लागला होता.
महायुतीच्या जागा वाटपानुसार पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या ताब्यात होते. मात्र, येथून सलग ५ वेळा सतीश चतुर्वेदी यांनी बाजी मारल्यानंतर शिवसेनेने पूर्व नागपूर मतदार संघ भाजपकडे सोपवला. त्यानंतर शिवसेनेने दक्षिण नागपूर मतदार संघावर आपला ताबा मिळवला. २००९ मध्ये भाजपचे कृष्णा खोपडे यांनी सतीश चतुर्वेदी यांना पराभवाचा धक्का दिला होता. आता पुन्हा सतीश चतुर्वेदी यांची नजर पूर्व नागपूर मतदारसंघावर आहे. त्यामुळे ते शिवसेनेकडे दुष्यंतसाठी पूर्व किंवा दक्षिण नागपुरातून उमेदवारी मागू शकतात. तसेच दुष्यंतच्या माध्यमातून शिवसेना देखील पुन्हा एकदा पूर्व किंवा दक्षिण नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवू शकते.
सध्या दक्षिण नागपुरातून माजी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे आमदार आहेत. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठीने सुधाकर कोहळे यांच्या जागी प्रवीण दटके यांना शहराध्यक्ष केले आहे. त्यामुळे युती झाल्यास दक्षिण नागपूरची जागा शिवसेनेला मिळू शकते. या परिस्थितीत शिवसेना दुष्यंतच्या नावावर डाव खेळू शकेल, हे नक्की.