नागपूर - महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, असे असतानादेखील या पीओपीच्या मुर्त्यांची सर्रास विक्री केली जात आहे. हा प्रकार सामाजिक संघटनांच्या निदर्शनात आल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. यानंतर मनपाच्या धरमपेठ झोनच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गोकुळपेठ बाजारात गणेश विक्री सुरु असलेल्या दुकानांवर छापा टाकला. यामध्ये १२ दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाईचे स्वरूप अतिशय सौम्य असल्याने या मूर्ती विक्रेत्यांना याचा काहीच फरक पडत नाही. यामुळे शहरात मनपाचे नियम फक्त कागदावरच ठेवत सर्रास पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या या मुर्त्यांची विक्री केली जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मनपाने शहरात पीओपी मूर्तींची विक्री करू देणार नाही, असे धोरण राबवले आहे. शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश मूर्ती विकणारी शेकडो दुकाने सजली आहेत. यापैकी बहुतांश दुकानांमध्ये 'पीओपी'चे बाप्पा विक्रीसाठी उपल्बध आहेत. हे सर्व चित्र डोळ्यांसमोर दिसत असतानासुद्धा प्रशासनाकडून अशा विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे.
या संदर्भात पर्यावरण प्रेमींनी विरोध करायला सुरुवात केल्यानंतर मनपा कर्मचारी केवळ एक हजारांचा दंड वसूल करून कर्तव्यपूर्ती केल्याचा देखावा करत आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.