नागपूर: समलैंगिकतेच्या मुद्द्यावरून सध्या चर्चाचे रान उठले असताना याच कारणामुळे एका १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही विद्यार्थिनी नागपूरच्या एका महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षाला शिकत होती. मूळचे हे कुटुंब उत्तर प्रदेशातील आहे. तिचे वडील केंद्र सरकारच्या विभागात कार्यरत आहेत. मृत विद्यार्थिनीला दोन लहान भाऊ देखील आहेत.
कुटुंबाला दिली होती माहिती: या विद्यार्थिनीचा कल समलैंगिकतेकडे होता व त्याबाबत तिने कुटुंबीयांना माहिती दिली होती. यामुळे तिच्या कुटुंबाला हादराच बसला होता. तिच्या या वृत्तीला घरच्यांनी विरोधही केला होता. तेव्हापासून ती विद्यार्थिनी सतत तणावात जगत होती. तिच्या आई-वडिलांची अनेकदा तिची समजूत काढली; मात्र त्यामुळे ती आणखीच तणावात राहू लागली होती. अशातच कुटुंबीयांनी तिच्या लग्नासाठी मुलगा पाहण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.
घरी कुणीही नसताना केली आत्महत्या: घरी कोणी नसताना विद्यार्थिनीने काल (सोमवारी) आत्महत्या केली. लेस्बियन असल्याने कुटुंबीय आणि समाज विरोध करीत आहे. स्वतःच्या मनाने जीवन जगता येत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
तरुण आणि तरुणीची आत्महत्या: लग्नाला विरोध असल्याने दोन दिवसांपूर्वी नवीन कामठी येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सावनेर तालुक्यातील तरुण आणि तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आत्महत्या करणाऱ्या दोघांत प्रेम संबंध होते. मात्र, दोघांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप खुलासा होऊ शकला नाही.
प्रेमसंबंधातून आत्महत्या: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश प्रकाश लालबागे या तरुणाने आज (सोमवार) पहाटे त्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समजताच किरण मारुती काकडे या तरुणीने आकाशचे घर गाठले. त्याला मृतावस्थेत बघून ती घरी परतली आणि त्यानंतर किरणने सुद्धा आत्महत्या केली. आकाश आणि किरण यांच्यात प्रेम संबंध होते, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. आकाशने आत्महत्या केल्यामुळेच किरणने सुसाईड केल्याचे बोलले जात आहे. त्याआधारे सावनेर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सावनेर पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.