नागपूर - सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बोबडे यांच्या नावाची शिफारस न्यायमूर्ती गोगोई यांनी कायदा मंत्रालयाकडे केली आहे. सरन्यायाधीशपदी बोबडे यांची नियुक्ती झाल्यास बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे ४७ वे सरन्यायाधीश ठरतील.
नागपूरच्या आकाशवाणी चौकातील याच घरी न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी वकील कुटुंबात झाला. न्यायमूर्ती बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे यांनी महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल पद भूषवले आहे. नागपूर विद्यापीठातून बोबडे यांनी कायद्याची पदवी घेतली. १९७८ साली ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य बनले आणि १९९८ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली. यानंतर १९९८ साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर निवड करण्यात आली. १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक : नागपुरात काँग्रेसचे अस्तित्व टिकणार का?
सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोई नंतर बोबडे हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत. नागपूर व महाराष्ट्राकरिता ही अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व बोबडे कुटुंबियांचे स्नेही विकास शिरपूरकर सांगतात. सम्यक बुद्धिमत्तेचे व स्थितप्रज्ञ असे न्यायमूर्ती शरद बोबडे हे तल्लख बुद्धिमत्तेचे व बॅलन्स वकील असल्याचेही शिरपूरकर सांगतात.
कायदेपंडित असणारे शरद बोबडे यांचे आजोबा मनोहर बोबडे यांचा अर्धाकृती पुतळा जिल्हा सत्र न्यायालयाच्या चौकात आहे. सुमारे २ महिन्यांपूर्वी शरद बोबडे हे नागपुरात महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या भूमिपूजन कार्यक्रमात आले होते. नागपुरात विधी विद्यापीठ व्हावे, यासाठी न्यायमूर्ती शरद बोबडे प्रयत्नशील होते. महाराष्ट्र विधी विद्यापीठाचे ते कुलगुरू देखील आहेत. कुठल्याही घटनेने डगमगून न जाणे हा शरद बोबडे यांचा स्वभाव असल्याचेही शिरपूरकर सांगतात.
हेही वाचा - नागपुरात पोलिसांचेच ड्रग्स माफियांशी साटेलोटे, पाच पोलीस निलंबित
प्रक्रियेनुसार सध्याचे न्यायाधीश पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठवतात. सरन्यायाधीशांची नियक्ती राष्ट्रपती भवनातून होते. गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यास १८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.
हेही वाचा - नागपुरात मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट; पारंपरिक मतदारांमध्ये निरुत्साह