नागपूर - लॉकडाऊनच्या कठीण काळात सर्वत्र माणुसकीचे दर्शन होत असताना काही लोकांनी आपला गोरख धंदा सुरू केला आहे. नागपूरात एका मिनी ट्रक चालकाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. एकदा गेलेला पैसा परत मिळत नाही, असा सर्वांचा समज आहे मात्र, या ट्रक चालकाने थेट त्या चोरट्याला संपर्क करून आपला पैसा परत मिळवला आहे.
प्रमोद सिंग असे या मिनी ट्रक चालकाचे नाव आहे. चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून 15 हजारांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने चोरली होती. प्रमोद यांनी त्या चोरट्याला फोन करून स्वतःची कैफियत ऐकवली तेव्हा त्या चोरट्याचे मन परिवर्तन झाले आणि त्याने आठ हजार रुपयांची रक्कम प्रमोद यांच्या खात्यात परत केली.
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने नागरिक त्रस्त आहेत, मोलमजुरी करून खाणारा कष्टकरी वर्ग तर सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच कोणाची आर्थिक फसवणूक होऊन बँकेतील सर्व रक्कम चोरट्यांनी पळवली तर ती व्यक्ती किती अडचणीत येईल याची कल्पना करणेही कठीण आहे. प्रमोद सिंग यांच्यासोबत असेच झाले. त्यांनी थेट चोरट्यांना फोन लावून आपल्या बिकट अवस्थेबद्दल कल्पना दिली. त्यांची कैफियत ऐकून चोरांनाही पाझर फुटला आणि चोरलेल्या रकमेचा आर्धा भाग चालक प्रमोद सिंग यांच्या खात्यामध्ये पुन्हा पाठवला.