नागपूर : नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानतर्फे आज नागपुरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आहेत. नागपुरातील गीता मंदिर परिसरात त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. व्याख्यानाच्या कार्यक्रम स्थळाबाहेर वंचितने भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. तसेच संभाजी भिडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.
वंचितचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात : संभाजी भिडे यांच्या कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावरच पोलिसांनी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने पोलीस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी संभाजी भिडे यांचे समर्थक जय श्रीरामचे नारे देत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संभाजी भिडे कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांना वृत्तांकन करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे वातावरण आणखीच तापले होते.
भिडे समर्थक वंचित आमनेसामने : नागपूरच्या गीता मंदिर परिसरात संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यांनी शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा निषेध करत काळे झेंडे दाखवले. यावेळी संभाजी भिडे यांचे समर्थक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
संभाजी भिडे विरोधात वंचित आक्रमक : काही दिवसांपासून संभाजी भिडे हे राज्यभर दौरा करत आहेत. मात्र,ते ज्या ज्या ठिकाणी जात आहेत, त्या त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोध केला जातो आहे. यापूर्वी संभाजी भिडे यांची चंद्रपूरमध्ये देखील जाहीर सभा होती. तिथेही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या सभेला जोरदार विरोध केला होता.
हेही वाचा - Chandrapur News : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे समर्थक आमनेसामने