नागपूर - शहरातील मेडीकल चौक परिसरात एका चारचाकीमध्ये देशी आणि विदेशी दारूचा साठा आढळून आला आहे. यावेळी ९०० लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.
मध्यप्रदेशमध्ये ही दारू तयार केली जात होती. तसेच भाडेतत्वावर गाडी घेऊन ही दारू छत्तीसगडमध्ये पोहोचवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, ही गाडी नागपूरच्या कुठल्या परिसरात फिरली? याबाबत महापालिकेच्या कॅमेऱ्याचा वापर करून तपास केला जात आहे. त्यामधून ही गाडी कोणाची आहे? हे तपासले जाणार आहे. यामागे आंतराज्यीय दारू तस्करी करणारी टोळी सक्रीय असल्याचा अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्य केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.