नागपूर - दोन वर्षांपासून विदर्भाच्या हक्काचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईला पळवल्याचा आरोप करत आज नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ( Vidharbha Rajya Andolan Samiti ) तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. विदर्भावाद्यांनी सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक ते विधानभवन पर्यत मानवी साखळी तयार करून आपला रोष व्यक्त केला. ( Vidarbhawadi Agitation Seetabardi Nagpur ) १ मे ला महाराष्ट्र दिनी राज्य शासनाच्या कार्यालयांवरील फलकांवर काळं फसून त्यावर विदर्भ लिहिणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिली.
अबकी बार विदर्भ सरकार,महाराष्ट्र सरकार विदर्भातून हद्दपार अशा आशयाचे फलक घेऊन विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी केली. विदर्भावर सातत्याने सुरू असलेल्या अन्यायामुळे केंद्र सरकारने तत्काळ स्वातंत्र्य विदर्भ राज्याची निर्मिती करावी. विदर्भातच सर्वाधिक विजेची निर्मिती होते त्यामुळे विदर्भातील जनतेला 200 युनिट पर्यंतची वीज निशुल्क द्यावी. कृषी पंपाचे वीज कनेक्शन कापणे तात्काळ बंद करावे अशा मागण्या, यावेळी माजी आमदार आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं -
विदर्भाच्या हक्कचे अधिवेशन मुंबईला पळवल्यानंतर एक स्पष्ट झाले आहे की त्यांच्या लेखी विदर्भाची इज्जत नाही. ते आमची इज्जत करत नसतील तर आम्ही महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं? असा संतप्त प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे.