नागपूर - कचरा संकलन करणारी कंपनी कचऱ्याच्या गाडीत दगड-माती टाकून कचऱ्याचे वजन वाढवत आहे. शासनाची दिशाभूल करणारा हा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी समोर आणला आहे. हा प्रकार उघड झाल्याने, कचऱ्याच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आता आमदार विकास ठाकरे यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या गैरप्रकारात कंपनीत काम करणारे सहभागी आहेत. कचऱ्यात मातीचे प्रमाण जास्त ठेवण्याचे कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. तसे न करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने कर्मचारी नोकरी जाईल या भीतीने गप्प होते, असे ठाकरे यांनी सांगितले.
महापालिकेने शहरातील दहा झोनमधील विविध भागांतील कचरा संकलन करण्याचे काम एजी एन्व्हायरो आणि बिवीजी एन्व्हायरो या खाजगी कंपनीला दिले आहे. कचऱ्याच्या वजनाप्रमाणे महापालिका त्या कंपनीला पैसे देते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कचऱ्याचे प्रमाण कमी राहत असल्याने कचऱ्याच्या गाडीत माती भरुन कचऱ्याचे वजन केले जात असल्याची तक्रार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना मिळाली होती.
तक्रारीची शहानिशा करण्यासाठी विकास ठाकरे यांनी कचरा संकलन कशा प्रकारे केले जाते याचे स्टिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कचरा संकलन करणारी कंपनी हा गैरप्रकार करत होती. तेव्हा महापालिकेचे आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करुन दुर्लक्ष करत असल्याचे देखील समोर आले आहे. कचरा संकलन करणाऱ्या कंपनीने महापालिकेची २० कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. महापापालिकेकडून या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा. मात्र तसे होत नसेल तर या संदर्भात गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.