नागपूर - मोसंबीच्या झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. हा रोग 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' बुरशीजन्य रोग असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे बुरशी लागलेली फळं चांगल्या फळांसह ठेवल्यास त्याचे संक्रमण वाढते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे.
सतत दमट हवामान आणि जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्याने हा रोग दर वर्षीच काही प्रमाणात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पसरतो. मात्र, यंदा त्याचे प्रमाण जास्त असल्याने संपूर्ण नरखेड आणि काही प्रमाणात शेजारच्या काटोल तालुक्यात मोसंबीच्या बागांमध्ये फळ गळतीचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत पूर्व विदर्भात झालेल्या पावसामुळे हे रोग जास्त प्रमाणात पसरल्याची शक्यता आहे. या रोगाचे प्राथमिक लक्षण म्हणजे झाडावरील फळे मोठ्या प्रमाणात गळतात.
त्यातल्या त्यात परिपक्व फळे लवकर गळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. सध्या नरखेड तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात असलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये हा रोग पसरला असून आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने आर्थिक संकटात असलेले शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फळ गळती वाढली असून काही बगिच्यांमध्ये तर 75 टक्क्यांपर्यंत फळगळती झाल्याने आणि उर्वरित फळांना डाग आल्याने शेतकरी पुरते निराश झाले आहे.
या वर्षी पाऊस समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांना मोसंबीच्या उत्पादनापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, फायटोप्थोरा ब्राऊन रॉट रोगामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाकडे लक्ष द्यावे आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.