नागपूर - पार्किंगच्या वादातून नागपुरात गोळीबार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शहरातील अहुजा नगरमध्ये राहणाऱ्या पलाश पाटील या तरुणाच्या घरावर हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र आरोपींनी पलाशच्या घरासमोर ठेवलेल्या दुचाकीची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती समजताच जरीपटका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
पलाश पाटील नामक तरुणाचा यांचा काही आरोपींसोबत मिसाळ लेआऊट येथे पार्किंगच्या वादातून भांडण झाले होते. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी पलाश पाटीलचा पाठलाग करत आहुजा लेआऊट येथील त्याच्या घरासमोर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी पलाशच्या घराच्या दिशेने केलेल्या फायरिंग मध्ये एक गोळी पलाशच्या घराच्या भींतीत घुसली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांच्या तपासाला सुरुवात केली आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर शहर पोलीस विभागाचे मोठे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपींनी किती गोळ्या झाडल्या याचा देखील तपास सुरू केला आहे.