नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजचे सभागृहातील भाषण हे शिवाजी पार्कवर झालेले राजकीय भाषण वाटल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे यांच्या भाषणाने शेतकरी वर्गाची आणि विदर्भाची घोर निराशा झाल्याचे सांगत आज विरोधकांनी सभात्याग केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमाफीचे वचन दिले होते. मात्र, आजच्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी एका पैशाच्या मदतीचीही घोषणा केली नाही. असे करून त्यांनी विदर्भासह शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा - 'हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार'
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. त्यावर विरोधी पक्षाने सडकून टीका केली आहे. विदर्भात अधिवेशन होत असताना मुख्यमंत्री विदर्भाबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे सध्या ते केवळ खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.