नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मनात कापरं भरली असावी. त्यामुळेच ते नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवत असावी असे नानांच्या वक्तव्यातून वाटत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लगावला आहे. ते नागपूर येथे पत्रकरांसोबत बोलत होते. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच त्यांच्यावर पाळत ठेवण्याची गरज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना का भासत आहे, याचे उत्तर तेच देऊ शकतात, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नाना पटोलेंनी काय केले आरोप
राज्यात काँग्रेस पक्ष बळकट होत असल्यामुळे माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत पाळत ठेवली जात असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी लोणावळा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केला आहे. मी कुठे जातो, कुणाला भेटतो, काय करतो याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिली जात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मी स्वबळाचा नारा दिल्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा - राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेते म्हणल्याचे कदाचित बैलांना ही आवडलेले नाही, फडणवीसांचा टोला