नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काल उद्धव ठाकरेंची जीभ घसरली होती. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर आज नागपुरात त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज नागपुरात भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या व्हेरायटी चौकात कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
उद्धव ठाकरे यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत आपला रोष व्यक्त केला आहे. यात कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काढलेली अंत्ययात्रा व्हेरायटी चौकावर नेण्यात आली. तिथे कार्यकर्त्यांनी तिरडी पेटवली. यावेळी व्हेरायटी चौकातए भाजपची निषेध सभाही झाली.
फडणवीसांबद्दल बोलाल तर जोडे खाल : यापुढे महाराष्ट्रात ज्या-ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणीसांवर बोलतील त्या-त्या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलाल तर, जोडे खाल असंही ते म्हणाले आहेत. त्यावरुन शिवसेना विरुद्ध ( उबाठा गट) भाजप अशी आमनेसामने येण्याची शक्यात आहे.
भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक : उद्धव ठाकरें यांनी काल नागपूर येथे झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय जहाल शब्दात टीकास्त्र सोडले होते. देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत असे ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहे. चिडलेल्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिवसेनेकडून लावण्यात आलेले उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडत आपला रोष व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर, भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टरला काळे फासत निषेध नोंदवला आहे.
ट्विटच्या माध्यमातून नाराजी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उबाठा गट) यांनी काल नागपूर येथे आयोजित मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या टिकेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकरेंचे वक्तव्य निंदनीय : उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
उध्दव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ : ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
- आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
- सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
- ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
- पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!,
- कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
- लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
- असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी अशी जहरी टीका फडणवीस यांनी ठाकरेंवर केली आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेले कलंक : उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला, महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही, तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले आहे. तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात, हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तुम्ही वाहिले हेही महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचे आणि मुलाच्या मंत्रिपदाचे ओझे सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिले. घरात बसून फुकटच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली. त्यामुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे. महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असा हल्लाबोल फडवीस यांनी केला आहे.