नागपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास जलदगतीने आरोग्य प्रशासनाला याची माहिती मिळावी. तसेच त्या व्यक्तीवर लवकर उपचार व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेने 'कोव्हिड-19' हे अॅप तयार केले आहे.
नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी हे अॅप डाऊनलोड करायचे आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरावी लागणार आहे. भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-१९ ची लक्षणे असल्यास नागपूर महानगरपालिकेचे डॉक्टर रुग्णाला संपर्क करणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
हेही वाचा- चिंताजनक..! केरळ, महाराष्ट्रासह तेलंगाणात कोरोनाचे 77 नवे रुग्ण
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज तिसरा दिवस आहे.