नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवाकरता काँग्रेसने जातीय समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी 'डीएमके' फॉर्म्युल्यावर काम करायला सुरुवात केली आहे. या फॉर्म्युल्यानुसार दलित मुस्लीम आणि कुणबी मतांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.
डीएमके म्हणजे दलित, मुस्लीम आणि कुणबी मतदारांचा काँग्रेसने तयार केलेला गट आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात २२ लाख मतदार आहेत. त्यापैकी निम्मे मतदार हे डीएमके गटात मोडतात. नागपूर हे बहुभाषिक लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. नागपूर शहरात तेली कुणबी यांची मते मोठी असल्याने या मतांवर सर्व पक्षांचा डोळा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेली मते ही भाजपच्या बरोबर राहिल्याने कुणबी मतांना आपल्या बाजूने वळवण्याकरता काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.
पारंपरिक मुस्लीम मतांसोबतच दलित मतावरही ही काँग्रेसचा डोळा असल्याने या निवडणुकीत काँग्रेसने डीएमके नावाचा नवा फॉर्म्युला तयार केला आहे. या फार्मुल्यानुसार डी म्हणजे दलित, एम म्हणजे मुस्लीम, आणि के म्हणजे कुणबी मतांना आपल्या बाजूने वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. नागपूरसह विदर्भ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या बालेकिल्ल्यात सर्व जातीची मते भाजपच्या पारड्यात पडू नयेत, याकरिता नागपुरात तयार झालेला फॉर्म्युला संपूर्ण विदर्भात लागू केला जाणार असल्याचेदेखील संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना प्रश्न केला असता त्यांनी असल्या कुठल्याही फॉर्मुल्यावर काँग्रेस काम करत नसल्याचे म्हटले आहे.