नागपूर - हुतात्मा जवान भूषण सतई यांच्यावर नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १३ नोव्हेंबरला श्रीनगर येथील गुरेज सेक्टर येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये भूषण यांना वीरमरण आले होते. रविवारी रात्री भूषण यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूर आणण्यात आले होते. रात्रभर पार्थिव कामठी येथील गार्ड रेजिमेंट येथे ठेवण्यात आले होते. लष्कराकडून मानवंदना दिल्यानंतर आज भूषण यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अलोट जनसागर लोटला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सुनील केदार आणि नितीन राऊत हे देखील उपस्थित होते.
आज सकाळी वीरजवान भूषण याचे पार्थिव त्याच्या घरी आल्यानंतर संपूर्ण फैलपूर परिसरात भूषण सतई अमर रहे च्या घोषणांनी निनादून गेला होता. याच वेळी नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या. त्यानंतर भूषण यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. कोटोलमध्ये भूषण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भूषण शांती सेनेचे सदस्य -
भूषण सतई हे शांती सेनेचा सदस्य राहिले होते. २०११ मध्ये सैन्यात भर्ती झाल्यानंतर सुमारे साडे आठ महिने ते दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर मात्र भूषण हे सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात झाले होते. भूषण यांचा कुटुंबीयांवर फारच जीव होता, घरचे त्यांच्या लग्नाची तयारी करत असताना ते त्यांच्या बहिणीसाठी स्थळ शोधण्यात व्यस्त होते. विजया दशमीसाठी भूषण नागपूरला आले होते, त्यावेळी देखील बहिणीच्या लग्नाची त्यांना सर्वाधिक चिंता होती. बहीण भावांमध्ये प्रचंड जिव्हाळा असल्याने ते ताईला दिवसातून एक फोन करायचेच. मात्र भाऊ बीजेच्याच दिवशी त्या बहिणीला आपल्या जिवापेक्षा प्रिय भावाला शेवटचा निरोप द्यावा लागणे या पेक्षा दुर्दैवी दुसरी घटना असू शकत नाही, अशी भावना भूषण यांच्या नातेवाईंकांनी यावेळी व्यक्त केली.
भारताच्या या वीर जवानास ईटीव्ही परिवाराकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली