नागपूर - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन व बेडच्या मागणीत किंचीत घट झाली आहे. मात्र सध्याचे संकट पाहता जिल्ह्यात दररोज 200 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून यासाठी नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे योग्य वितरण करण्याचे आदेश केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.
ऑक्सिजन संदर्भात आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. दोन्ही मंत्री महोदयांच्या संयुक्त बैठकीत ऑक्सिजन पुरवठा, सिलिंडर खरेदी ऑक्सिजन प्लांट पाईपलाईन, रेमडेसिवीरच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. आमदार आशिष जैस्वाल, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह वाहतूकदार संघटनेचे प्यारेखान उपस्थित होते.
सध्या जिल्ह्यात उत्पादित ऑक्सिजन व्यतिरिक्त 140 मेट्रीक टन ऑक्सिजन भिलाईतून येत आहे. शहरातील परिस्थिती पाहता 160 मेट्रीक टनाच्या जवळपास ऑक्सिजन रोज उपलब्ध होत आहे. सर्व रुग्णालयांच्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा करता येईल. पुरवठा झाल्यावर संबंधित वाहतूकदारांचे देयक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.
ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली
तिसऱ्या लाटेला विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची तांत्रिक मदत करण्याबाबत आश्वस्त केले. त्यासाठी पाऊले उचलावी. सध्या ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात असलेले 20 हजार सिलिंडरही अपुरे पडत आहेत. यामुळे सिलिंडर खरेदीची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने करावी. चीनमध्ये मोठ्या क्षमतेचे ॲल्युमिनीअमचे सिलिंडर आहेत, त्याची व्यावहारिकता तपासून खरेदी करण्याच्या सुचना गडकरी यांनी दिल्या आहेत.
कोरोना नियंत्रणात प्रशासनाने युद्ध सदृश्य परिस्थितीत चौकटीबाहेरचा विचार करून प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवला पाहिजे. या जाणिवेने सहृदयतेने काम करावे. दोन्ही मंत्री मदतीसाठी तयार आहेत. यात बेडसह इतर सोयी सुविधा वाढवण्यासाठी सर्वोतरी नियोजन करावे, असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत.