नागपूर - शहरातील सीए मार्गावरील गीतांजली टॉकीज चौकात काल पहाटे (सोमवारी) झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुश्रीक खान आणि कामरान अहमद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. तर अन्य तीन आरोपींचे नाव देखील निष्पन्न झाले असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिली आहे. प्रकरणातील जखमी मोसीन सोबत असलेल्या पूर्व वैमनस्यातून त्यांनी मोसीनवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मोसीनचा मुश्रीक खान आणि कामरान अहमद यांच्या सोबत आमना-सामना झाला. तेव्हा एकमेकांकडे बघून खुन्नस दिल्याने संतापलेल्या आरोपींनी मोसीनला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात जुने वैमनस्य आहे. २०२० मध्ये मोसीन खानच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. एवढंच नाही तर २०१५ मध्ये सुद्धा दोन्ही गटात मारामारी देखील झाली होती. या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी मुश्रीक खान आणि कामरान अहमद यांनी मोसीनचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये एक गोळी मोसीनच्या पायाला लागली आहे.
अनेक दिवसांपासून सुरू होता पाठलाग -
वीस दिवसांपूर्वी ज्यावेळी दोन्ही गटाचा आमना-सामना झाला होता, त्यावेळी एकमेकांनी बघून घेण्याची धमकी दिली होती. मोसीन सोबत सुरू असलेल्या वादाचा अंत करण्याच्या उद्देशाने आरोपी मुश्रीक खान आणि कामरान अहमद यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मोसीनवर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. मोसीनचा दिनक्रम काय आहे, कोणत्या वेळी तो कुठं जातो या सर्वांची माहिती गोळा केल्यानंतर आरोपींनी काल पहाटे त्याचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार केला. मात्र सुदैवाने एक गोळी त्याच्या पायाला लागल्याने तो थोडक्यात बचावला आहे.