नागपूर - १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण करताच अगदी थाटात दवाखाना टाकून तिथे गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या एका झोलाछाप डॉक्टरला नागपूरच्या नवीन कामठी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चंदन नरेश चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून तो इंटरनेटवर विविध व्याधींवरील उपचार पद्धती बघून आणि पुस्तके वाचून गरीब रुग्णांवर उपचार करत असल्याचा खुलासा झाला आहे. एवढंच काय तर हा बोगस डॉक्टर नर्सिंगचे देखील प्रशिक्षण देत असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याच्या दवाखान्यातून ऑलोपॉथिक औषधीचा साठा आणि उपकरणे जप्त केली आहेत.
सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असताना बहुतांश दवाखाने रुग्णांच्या गर्दीने भरलेले दिसून येत आहे. त्यातच नवीन कामठी पोलिसांना चंदन चौधरी संदर्भात अनेक तक्रारी मिळू लागल्या असल्याने पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान त्याच्या दवाखान्यात कोरोनावर उपचार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येतात पोलिसांनी या धर्मार्थ दवाखान्याला भेट दिली. संचालक चंदन नरेश चौधरी यांच्या जवळ वैद्यकिय व्यवसायासाठी आवश्यक महाराष्ट्र मेडीकल कौन्सलिंग नोंदणीकृत प्रमाणपत्र नाही, तरी देखील आरोपी हा वैद्यकीय व्यवसाय करत होता. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ४२० भादंवि सहकलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय कायदा अन्वये गुन्हा नोंदविला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
बोगस डॉक्टरची पार्श्वभूमी
आरोपी डॉक्टर हा बिहार येथील रहिवासी आहे. तो अनेक वर्षांपासून नागपूर येथेच राहतो. बिहारमध्ये राहत असताना आरोपी चंदनने एका डॉक्टरकडे कंपाउंड म्हणून काम करायचा. तिथून मिळालेल्या अनुभवाचा गैरफायदा घेऊन आरोपीने नागपूरला धर्मार्थ दवाखाना थाटला होता. दरम्यान या व्यवसायात जोखीम जास्त असल्याने त्याने मध्यंतरीच्या काळात दवाखाना बंद करून आईस्क्रीम विक्रीचे काम सुरू केले होते. त्याच काळात आरोपीने नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर त्याने पुन्हा धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. त्याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गरीब रुग्ण यायचे. चंदनने यूट्यूब आणि इंटरनेटच्या माध्यमातून रुग्णाला इंजेक्शन देणे, सलाईन देणे व औषध उपचार देणे शिकला होता. एवढेच नव्हेतर, त्याने कोरोना रुग्णांवरही उपचार केले. परंतु, चंदन बोगस डॉक्टर असल्याची माहिती मिळताच नवीन कामाठी पोलिसांनी रुग्णालयात धाड टाकून त्याला अटक केली आहे
अवैध गर्भपात देखील करायचा…
आरोपी डॉक्टरच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात ऑलोपॉथिक औषधसाठा आणि उपकरणे मिळून आली आली आहेत. या दवाखान्यात अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचा खुलासा झाला आहे. तसेच तो लैंगिक समस्येची औषधं बनवित होता आणि ते संबंधित जडी-बुटीच्या भुकटीमध्ये मिसळून लोकांना देत होता. अपेक्षित प्रभाव दिसून पडताच लोकांचा चौधरीवर विश्वास वाढत होता.