नागपूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपाच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करत, आंदोलन करण्यात आले. नागपूरमधील संविधान चौकात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपाचे नेते प्रवीण दटके, समीर मेघे, विकास कुंभारे, कृष्ण खोपडे, मोहन मते, टेकचंद सावरकर यांची उपस्थिती होती.
राज्यात भाजपाचे सरकार असताना आरक्षण मिळावे यासाठी अध्यादेश काढण्यात आला. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसारखे ओबीसी नेते असतानाही त्यांनी अध्यादेशाकडे लक्ष दिले नाही. परिणामी आरक्ष रद्द झाले असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
... तर महाविकास आघाडींच्या नेत्यांना गावबंदी करू - बावनकुळे
ठाकरे सरकारकडे आरक्षणाची फाईल पडून आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्यासाठी सरकारकडे वेळ आहे. पण सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा आयोगाची नियुक्ती करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. निवडणूक आयोगाकडून देखील आयोगाचे गठण करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र सरकारने आयोगाची नियुक्ती केली नाही, असेही यावेळी बावनकुळे यांनी म्हटले आहे.सरकारने तीन महिन्यांच्या आत आयोगाचे गठण करावे, जनगणना करून ओबीसींना आरक्षण मिळून द्यावे. जर असे न झाल्यास महाविकास आघाडींच्या नेत्यांना गावबंदी करू, असा इशाराही यावेळी बावनकुळे यांनी दिला आहे.
हेही वाचा - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन नागपुरातून!