नागपूर - राज्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल (रविवारी) राज्यातील जनतेला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी राजकीय पक्षांनाही उद्देशून काही सूचना केल्या आहेत. त्यात राज्यात आजपासून आंदोलनाला मनाई करण्यात आली आहे. तर येत्या 24 तारखेला भारतीय जनता पक्षाकडून वीज बिलाच्या मुद्द्यावर जेलभरो आंदोलन केले जाणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेलभरो आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ज्याप्रमाणे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जबाबदार विरोधक म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे, त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ वीज कनेक्शन खंडित करण्याच्या निर्णयाला देखील स्थगिती द्यावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.
काय म्हणाले बावनकुळे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ एक बैठकीचे नियोजन करून लॉकडाऊनच्या काळातील 100 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करावे, सरासरी वीज बिलात दुरुस्ती करावी, बारा बलुतेदारांचे कोरोनाकाळातील वीज बिल माफ करू, यासह ज्या घोषणा केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी तत्काळ करावी. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करून सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याकडे घेऊन जाणारा ठरणार असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - सामना कोण वाचतो? आमदार गोपीचंद पडळकर यांचा शिवसेनेवर निशाणा
कोरोनाचा प्रभाव कमी होताच पुन्हा आंदोलन करणार -
सध्या मुख्यमंत्री आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतीय जनता पक्षाने 24 फेब्रुवारीला होणारे जेलभरो आंदोलन स्थगित केला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांवर सकारात्मकतेने विचार केला नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच भारतीय जनता पक्ष पुन्हा या विषयाला घेऊन आंदोलन करेल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.