नागपूर - जिल्ह्यात केवळ २४ तासात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची हत्या झाली आहे. गेले काही दिवस क्राईम कॅपिटल असलेले नागपूर शहर शांत दिसत होते. मात्र, एका दिवसात तिघांची हत्या झाल्याने पुन्हा गुन्हेगारी जगत डोके वर काढू लागले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हत्येची पहिली घटना जिल्ह्याच्या कन्हान भागात घडली. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले शेंडे यांच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. संजू खडसे, असे मृत तरुणाचे नाव आहे. संजू आणि आरोपी एका बारमध्ये मद्यपान करत असताना बाजूच्या टेबलवर बसलेल्या तिघांशी त्यांचा वाद झाला होता. त्यातूनच संजूची हत्या करण्यात आली आहे. संजूची हत्या राजकीय वादातून झालेली नाही हे पोलिसांनी आधीच स्पष्ट केलेले आहे. पोलिसांनी संजूच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
हत्येची दुसरी घटना नागपूर शहराच्या यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौक येथील सावजी हॉटेलमध्ये घडली. समीर शेख नावाच्या व्यक्तीची जेवण करताना अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केली. मृत समीर शेख हा त्याच्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी आर.के सावजी नावाच्या हॉटेलमध्ये गेला होता. त्याचवेळी समीर शेखवर अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत समीरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. मृत समीर शेख हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी समीरच्या खुनाचा तपास सुरू केला आहे.
तिसरी घटना-वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हिमांशू ढेंगे नावाच्या तरुणाची दगडाने ठेचून अज्ञात आरोपींनी हत्या केली आहे. हिमांशूची ओळख पटू नये या करता आरोपींनी त्याच्या तोंडावर दगड टाकून त्याचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना मृताची हिमांशू म्हणून ओळख पटल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. समीर आणि हिमांशू या दोघांची हत्या तर अवघ्या दीड तासात झाल्याने शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गृह जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- विदर्भातील पराभवाची सुरुवात नागपूरपासून, जयंत पाटलांचा भाजपला टोला