नागपूर - शहरात केवळ दहा दिवसांच्या कालावधीत तीन खुनाच्या घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर नगराळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांची बदली आर्थिक शाखेत करण्यात आली आहे. एवढेच नाही तर नगराळे यांच्यासह गुन्हे प्रगटीकरण (डीबी) पथकातील २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा बदली करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
लहान मोठ्या गुन्हेगारांसाठी नंदनवन ठरत असलेल्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना उत आलेला आहे. त्यातच गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक कमी होत असल्याने अनेक गुन्हेगारी घटना घडू लागल्या आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल तीन खुनाच्या घटना घडल्या आहे. ज्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाल्याचा निष्कर्ष काढला जात होता. अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी अनेक तास कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन केले असता अनेक कर्मचारी दिलेल्या बिटवरील कामात दुर्लक्ष करत असल्याचे पुढे आल्यानंतर २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी अहवाल पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे सादर केला असता त्यांनी तत्काळ प्रभावाने पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत केली आहे. तर त्यांच्या जागी कामठीचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नवीन कामठीची जबाबदारी जुनी कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मालचे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
दहा दिवसात तीन खून
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्तरंजित घटना वाढल्या आहेत. केवळ दहा दिवसांच्या अंतरात तिघांचा खून झाल्याची घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन घटनेतील आरोपी हे विधीसंघर्ष बालक आहेत. पहिली घटना ही १९ एप्रिल रोजी घडली होती. दोन आरोपींनी मिळून लेडी डॉन म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पिंकी वर्मा या तरुणीचा खून केला तर दुसरी घटना २६ तारखेला घडली. दोन विधीसंघर्ष बालकांनी संगनमत करून इंद्रजित बेलपारधी नामक गुंडाचा काटा काढला. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात १८ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद होती तर आरोपी विधीसंघर्ष बालकांवर देखील २०१९ मध्ये एकाचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. तिसरी घटना २७ एप्रिल रोजी घडली आहे. यामध्ये पाच आरोपींनी संगनमत करून रूपेश नावाच्या तरुणाचा खून केला आहे.