नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या नोकरी गेल्या, काहींचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. त्यात वाढती माहगाई यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबियांची आर्थिक स्थिती ही बिकट झाली आहे. हाताला काम नसल्याने पुढे काय आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा या विवंचनेतून सर्व जण जात आहे. याच आर्थिक तंगीला कंटाळून शुक्रवारी नेरूळ नवी मुंबई येथील शेषनाथ द्विवेदी या युवकाने वाशी खाडी पुलावरुन पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाहतूक पोलीस व कोळी बांधवांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. सध्या त्याच्यावर नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न -
शेषनाथ द्विवेदी यांची लॉकडाऊनमुळे नोकरी गेली होती. कित्येकदा प्रयत्न करूनही त्यांना नोकरीही मिळत नव्हती त्यामुळे ते घरीच होते. हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणात कर्जाचे हप्ते थकलेले होते. त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होता व वैफल्यग्रस्त झाला होता. त्यामुळे त्यांच्या मनात स्वतःला संपून टाकण्याचे विचार येऊ लागले त्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तो शुक्रवारी वाशी खाडीपुलावर गेले व त्यांनी या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षदर्शिनी दिली पोलिसांना माहिती -
शेषनाथ द्विवेदी यांनी वाशी खाडी पुलावरून पाण्यात उडी मारतांना काही लोकांनी पाहिले व त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारावर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर यांनी हवालदार शहाजी फाटांगरे, राजेंद्र दांडेकर, वैभव कदम आणि मनाजी बोराडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस व कोळी बांधवांच्या मदतीने वाचविण्यात यश -
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर सुदैवाने त्या ठिकाणी स्थानिक मच्छिमार रमेश सुतार आणि शाम पाटील हे बोट घेऊन उपस्थित होते. पोलीस पथकाने या कोळी बांधवांची मदत घेऊन बुडणाऱ्या शेषनाथ द्विवेदी याला वाचवण्यात यश आले आहे. त्यांना नवी मुंबईतील वाशी महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर यांनी दिली आहे.