मुंबई - ज्येष्ठ लेखिका गिरीजा किर यांचे आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या 86 वर्षाच्या होत्या. वांद्रे येथील साहित्य सहवास मधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
गिरीजा किर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1933 रोजी धारवाड इथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना लेखन आणि वाचन यांची प्रचंड आवड होती. मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठीतून बीएची पदवी मिळवली. त्यानंतर लेखन प्रवासाला सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांसाठी नियतकालिक निघत असत त्यातूनच त्यांनी लेखनाला सुरूवात केली. माहेर, मालिनी, ललना, अनुराधा, प्रपंच आशा काही नियतकालिकात त्यांनी विपुल लेखन केले. 1968 ते 1978 या काळात त्यांनी अनुराधा या नियतकालिकाच्या उपसंपादिका होत्या. त्यानंतर पूर्णपुरुष, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याचा, आभाळमाया, आत्मकथा, चाहूल, अभिशाप आशा काही कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. तसेच खूप गोष्टी, देणारे हात, साहस कथा, शुरांच्या कथा, निलराणीचा दरबार, कुमारांच्या कथा, असे बालसाहित्यही त्यांनी लिहिले.
आपल्या लेखन कारकिर्दीत कथाकार, कादंबरीकार आणि बालसाहित्यकार अशी बहुरंगी आणि बहुढंगी अशी ओळख गिरीजा किर यांनी निर्माण केली.1999 साली 'कलावंत' या पुस्तकाद्वारे कलाकारांच जगणं, वागणं, बोलणं, त्यांचे कौटूंबिक संबंध यांचा वेध घेण्यात आला होता. गिरीजा किर यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून, एक चतुरस्त्र लेखिका आपल्यातून निघून गेल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होते आहे. त्यांच पार्थिव काही काळ राहत्या घरीच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांची अंत्ययात्रा रात्री 10 वाजता घरापासून निघेल.