मुंबई - विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथील असलेल्या इमारती जुन्या व जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा या इमारतीचा छत पडण्याच्या घटना घडत असतात. शनिवारी (दि. 25 सप्टेंबर) इमारत क्रमांक 71 मध्ये घरामधील स्वयंपाक घराचे छत (स्लॅब) कोसळल्याने लक्ष्मी दयानंद गायकवाड (वय 56 वर्षे) या जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला सहा टाके लागले आहेत. दैव बलवत्तर म्हणून त्या थोडक्यात बचावल्या. या इमारतींचा पुनर्विकास लवकर मार्गी लागावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कन्नमवार नगरमध्ये अडीशेपेक्षा जास्त इमारती या ठिकाणी आहेत. त्यातील बऱ्याच इमारती या जीर्ण झालेले आहेत. इमारत क्रमांक 71 देखील 55 वर्षे जुनी इमारत आहे. या ठिकाणी विकासकाने या इमारतीतील लोकांना फसवल्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. या इमारतीतील छत कोसळण्याची ही चौथी घटना आहे. या इमारतीचा अभिहस्तारण झाल्याने म्हाडा या ठिकाणी लक्ष देत नाही. मात्र, राहते घर सोडून जायचे कुठे असा प्रश्न आता या इमारतीतील रहिवाशांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे ते जीव मुठीत ठेवून दिवस काढत आहेत.
आम्ही 27 वर्षापासून या इमारतीमध्ये राहतो. विकासकाने 2018 मध्ये इमारत पुनर्विकाससाठी घेतली. यानंतर आम्ही आमची इमारत रिकामी केली. मात्र, तीन महिन्यातच विकासकाने भाडे देणे थकवले. यामुळे इमारतीतील आम्ही सर्व परत या ठिकाणी राहण्यासाठी आलो. स्लॅब कोसळल्याने माझी पत्नी जखमी झाली. थोडक्यात तिचा जीव वाचला यामुळे लवकरात लवकर आम्हाला नवीन विकासक मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेने मदत करावी, असे दयानंद गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा - पुढील पाच दिवस पावसाचे.. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट