मुंबई - आज हनुमान जयंती आहे मात्र चर्चा खा. नवनीत राणा यांची आहे. त्याला कारणही तसेच आहे. नवनीत राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मागच्या वर्षी याच महिन्यात हनुमान चालीसाचे पठण करण्याचा घाट घातला होता. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे आमदार पती रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. एवढेच नाही तर न्यायालयात उभे केले असता त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. भायखळ्याच्या तुरुंगात त्यांना हा कालावधी घालवावा लागला होता. त्यावेळी त्यांची तब्येतही बिघडली होती. त्यामुळे लीलावती रुग्णालयात राणा यांना हलवण्यात आले होते.
मॉडेलिंग ते चित्रपट कलाकार - नवनीत राणा या मूलतः कलाकार आहेत. त्यांनी प्रामुख्याने तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००३ साली आलेला दर्शन हा त्यांचा पहिला कन्नड चित्रपट. यामध्ये त्यांनी नंदीनीची भूमिका साकारली होती. त्यांनी एकूण 24 चित्रपटांमध्ये काम केल्याचे दिसून येते. त्यातील बहुतांश चित्रपट तेलुगु आहेत. त्याचबरोबर तमिळ, मल्याळम तसेच कन्नड या इतर दाक्षिणात्य भाषिक चित्रपटांमध्येही नवीनत राणा यांनी काम केले आहे. काही पंजाबी आणि हिंदी चित्रपटातली नवनीत राणा झळकल्या आहेत. नवनीत राणा यांच्या आत्तापर्यंतचा शेवटचा चित्रपट म्हणजे २०१० साली आलेला पंजाबी चित्रपट छेवन दरिया. यानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम केला. त्यांच्या कला गुणांची सुरुवात मात्र मॉडेलिंगपासून झाली होती. बारावीच्या वर्गात असतानाच नववीत राणा यांनी मॉडोलिंगचा श्रीगणेशा केला होता.
सामाजिक भान आणि विवाह - नवनीत राणा या जरी चित्रपटामध्ये सुरुवातीला काम करत असल्या तरी त्यांना सामाजिक भान असल्याचे दिसून येते. त्यांचा विवाहसुद्धा एका सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच पार पडला. अमरावतीमध्ये रवी राणा यांच्याशी त्यांचे 2022 साली सामुदायिक विवाह कार्यक्रमात लग्न झाले. यावेळी तत्कालीन मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाबा रामदेव आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.
सर्वच सामाजिक उपक्रमात नवनीत राणांचा सहभाग - नवनीत राणा यांचे सामाजिक भान पाहता त्यांनी थेट राजकारणात उडी घेतली. त्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा उभ्या राहिल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि अपक्ष उमेदवार म्हणून नवनीत राणा जिंकून आल्या. राजकीय जीवन जगताना लोकांच्यात मिसळण्याची त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची हातोटी नवीनत राणा यांनी जपलेली दिसते. त्यामुळेच त्या अमरावती या त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. एवढेच नाही तर, त्या सर्वच कार्यक्रमांच्यामध्ये हिरीरीने सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. आदिवासी नृत्य असो किंवा सार्वजनिक लंगर, क्रिकेटचा खेळ असो की बैलगाडीची सवारी त्या प्रत्येक कार्यक्रमात भाव खाऊन जातात असेच दिसते. नुकतेच रामवनमीला नवनीत राणा यांनी बुलेट सवारी करुन सर्वांनाच चकित करुन सोडले होते. त्याचवेळी हेल्मेट न घालता राणा यांनी बुलेट चालवल्याने त्यांच्यावर टीकाही झाली.
पहिल्या निवडणुकीतही वाद - नवनीत यांचे लग्न २०११ मध्ये रवी राणा यांच्याबरोबर झाले. नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी अमरावतीतून मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले होते. परंतु या निवडणूकीत त्यांचा शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळ यांनी पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये मात्र त्यांनी आनंदराव अडसूळ यांना धोबी पछाड देत खासदारकी मिळवली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राणा निवडून आल्या, मात्र खासदार झाल्यानंतर त्या भाजपकडे झुकल्याचे दिसते.
राणा आणि वाद असेच समिकरण - अलिकडच्या काळात नवनीत राणा आणि वाद यांचे समिकरणच झाल्याचेही आपल्याला दिसून येते. वास्तविक राणा यांची राजकीय कारकीर्द सुरु झाल्यानंतरच त्या वादग्रस्त झाल्याचे दिसते. त्यांचा वाद कोणत्या पातळीवर झाला नाही असे नाही. अगदी स्थानिक पातळीपासून लोकसभेपर्यंत त्यांची कारकीर्द वादाने भरलेली दिसते. अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीत 2014 साली त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता.
खोट्या जात प्रमाण पत्राचा वाद - नवनीत राणा यांच्यावरही अनेक आरोप झाले. त्यातील अत्यंत महत्वाचा आरोप म्हणजे त्यांनी खोटे जातप्रमाणपत्र वापरुन निवडणूक लढवली. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना नुसते दोषी ठरवले नाही तर तब्बल 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याच प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी त्यांच्या वडिलांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र ते सापडत नाहीत. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचा अंतिम निकाल येईपर्यंत नवनीत राणा याच्या डोक्यावर अपात्रतेची तलवार लटकत राहणार आहे. राणा यांनी चर्मकार जातीचे प्रमाणपत्र नोंद करुन ही निवडणूक लढवली होती.
हनुमान चालीसा प्रकरण - सध्या नवनीत राणा गाजत आहेत त्या त्यांच्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर त्यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी त्यांनी जणु मोहीमच राबवल्याचे दिसते. वास्तविक मशिदींच्यावरील भोंग्यांचा विषय गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यातच राजकीय संघर्ष सुरू झाला होता. ऐन हनुमान जयंतीला नवनीत राणा यांनी अमरावतीमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर त्याची पुनरावृत्त करणार असल्याचे जाहीर केले. इथेच पहिली ठिणगी पडली. ही एक राजकीय स्टंटबाजी असल्याचे आरोप राणा यांच्यावर होऊ लागले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे पाहिले नाही. आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन राणा यांनी मातोश्री समोरील अडथळे दूर करुन हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना आणि त्यांचे पती आ. रवी राणा यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडीत घालण्यात आले. या प्रकरणात सध्या त्या जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणाचा आणि जात प्रमाणपत्राच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत पुलाखालून किती पाणी जाईल ते सांगता येत नाही. कदाचित त्यापूर्वीच पुढील लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसेच दिसत आहे. एकतर राज्यातील हनुमान चालीसा प्रकरणाचे सरकारी वकील घरत यांच्याकडून विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतले आहे. तसेच जात पडताळणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अजून बाकी आहे.