मुंबई - महाराष्ट्रातील सत्तेचा पेच कधी सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे सरकार येईल, असे वाटत असताना अजित पवार यांनी भाजपला दिलेली साथ राष्ट्रवादीला जड जात आहे. या सर्व प्रकारावर पडदा टाकण्यासाठी अजित पवार यांची मनधरणी सुरू आहे. सकाळी अजित पवार यांची छगन भुजबळ यांनी भेट घेतली. छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये तब्बल ४ तास या चर्चा झाली. मात्र, अजित पवारांच्या मनात काय आहे? हे मी सांगू शकत नाही, असे भुजबळ यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांनी बंड करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात बंड केले असल्याचे बोलले जात आहे.