मुंबई - शहरातील महागड्या जमिनीवर होत असलेल्या एस.आर.ए. प्रकल्पात अधिकाऱ्यांच्या संगनमताने हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान वडेट्टीवार बोलत होते.
एसआरए योजना आणि महसूल विभागातील अधिकारी सरकारी जमिनी गहाण ठेवून विकासकांसोबत संगनमत करत आहेत. त्यामुळे विविध प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे. जुहू परिसरातील फार मोठ्या भूखंडाच्या हस्तांतरणात ७ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शासनाने ब्रिटीश काळात 'बॉम्बे कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन' या नावाच्या कंपनीसाठी मुंबई उपनगरातील मोठी जमीन भाडेतत्त्वावर दिली होती. त्याची मुदत संपल्यानंतर १९९७ मध्ये अल्पेश अजमेरा बिल्डरने त्या नावाशी साधर्म्य असणारी 'बॉम्बे कन्स्ट्रक्शन कंपनी' अशा नावाने दुसरी कंपनी स्थापन केली. तसेच यामार्फत त्या भूखंडाचा ताबा घेतला. त्यांनी खोट्या कागदपत्राने केलेले भूखंडाचे करारपत्रच उच्च न्यायालयाने १९९९ मध्ये रद्द केले होते. मात्र, त्यानंतर २००७ साली बिल्डर अल्पेश अजमेराने तो भूखंड तिसऱ्या कंपनीला शेकडो कोटी रुपयांना विकला. एवढा मोठा भ्रष्टाचार महसूल आणि एसआरए विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय होणे शक्य नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या प्रकरणाची नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे अपील केली होती. मात्र, त्यानंतरही एसआरएचे तत्कालीन सीईओ संजय झेंडे यांनी त्या भूखंडावरील लाखो चौरस फुटांच्या एसआरए योजनेला परवानगी दिली आहे. हे प्रकरण गंभीर असून याची एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
नागपूर मेट्रोच्या खांबाना ४७८ कोटींचा रंग -
मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपला मोर्चा नागपूरकडे वळवला. नागपूर मेट्रोच्या कामातदेखील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रकिनारी असणाऱ्या प्रकल्पातील बांधकाम टिकाऊ होण्यासाठी विशिष्ट रंग लावला जातो. क्षारापासून वाचवण्यासाठी लावण्यात येणारा समुद्रापासून शेकडो किमी लांब असणाऱ्या नागपूरमधील मेट्रोच्या खांबांना लावण्यात आला. त्यासाठी ४७८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले. याची खरच गरज होती का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.