मुंबई - पावसाळ्यात व पाऊस पडून गेल्यावर दरवर्षी साथीचे आजार पसरतात, त्यात अनेकांचा मृत्यूही होतो. मात्र, यावर्षी साथीच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या अकरा दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला साथीच्या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
मुंबईत मागील वर्षी ऑगस्टच्या पहिल्या 11 दिवसात मलेरियाचे 853 रुग्ण आढळले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला, लेप्टोचे 46 रुग्ण आढळले त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोचे 645, हेपेटायटीसचे 135, तर डेंग्यूचे 153 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 11 दिवसात मलेरियाचे 259, लेप्टोचे 15, एच 1 एन 1 चे 24, गॅस्ट्रोचे 200, हेपेटायटीस बीचे 60 तर डेंग्यूचे 21 रुग्ण आढळले आहेत. या 11 दिवसात साथीच्या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नाही.
यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तरीही चालू वर्षात लेप्टोस्पायरेसिसची कमी प्रकरणे नोंदली गेली. आरोग्य विभागाकडून लेप्टोस्पायरेसिसबाबत 23 लाख 25 हजार 832 झोपडपट्टी व इतर ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यादरम्यान 1 लाख 92 हजार 152 प्रौढांना डॉक्सीसाइक्लिन आणि प्रोफिलेक्सिझोफ गोळ्या देण्यात आल्या. 3782 लहान मुलांना व 181 गर्भवती महिलांना अॅझिथ्रोमाइसिनच्या गोळ्या देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. नागरिकांमध्ये पोस्टर, वृत्तपत्र जाहिराती, सोशल मीडियाद्वारे कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात आल्याचे देखील आरोग्य विभागाने कळविले आहे.
कोणती काळजी घ्यावी -
ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत डेंग्युच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. बेडला जाळी वापरावी, खिडकीला पडद्यांचा वापर करावा, संपूर्ण कपडे परिधान करावेत. परिसर स्वच्छ ठेवून डासांची पैदास रोखावी. थर्माकोल बॉक्स, नारळांच्या कवट्या, टायर आदी वस्तूची विल्हेवाट लावावी. शौचालयांचा वापर केल्यावर, स्वयंपाक आणि खाण्यापूर्वी चांगली स्वच्छता ठेवावी. हिरव्या पालेभाज्या व्यवस्थित धुवाव्यात. फक्त घरगुती शिजवलेले पदार्थच खावे. फुटपाथवर विकले जाणारे सर्व बाह्य पदार्थ टाळावेत. लेप्टोस्पायरेसिस मुख्यत: साचलेल्या पाण्यात उंदरांनी तसेच प्राण्यांनी केलेल्या मलमूत्रामुळे होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात भिजू नये तसेच गमबूटचा वापर करावा. आपल्या पाळीव कुत्र्यांना लेप्टोस्पायरोसिस विरूद्ध लसीकरण करावे. सर्दी, उलट्या, अतिसार, सर्दी, खोकला, कावीळ, यासारखी लक्षणे आढळल्यास घरात स्वतः उपचार न करता वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करावेत.