मुंबई : दिवाळीच्या सणाला मुंबईत करीरोड नाक्यावरील मुंबई दरबार हॉटेलबाहेर ( Mumbai Durbar Hotel ) लावलेल्या फटाक्यांच्या विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामारी ( Clashes between firecracker sellers ) झाली होती. या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाला होता असून, त्याच्यावर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. काल मध्यरात्री जखमी चेतनची उपचारादरम्यान मृत्युशी झुंज संपली. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अगोदर खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल होता असून आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी विठ्ठल सुके याला अटक करण्यात आलेली आहे.
एन.एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : याप्रकरणी एन.एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरुवातीला आरोपी विठ्ठल सुके अद्याप पोलिसांच्या तावडित सापडला नव्हता. मात्र, नंतर विठ्ठल सुके या आरोपीला अटक करण्यात आली अशी माहिती एन.एम जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. करी रोड नाक्यावरील शिवस्मृती इमारती खाली दिवाळीच्या फटाक्यांचे दोन स्टॉल लागले होते. त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दोन्ही फटाके विक्रेत्यांमध्ये जीवघेणी हाणामारी झाली. या हाणामारीत विठ्ठल सुके याने चेतन नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला केला होता.
पूर्व वैमानस्यातून चाकूने गळ्यावर वार : हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला होता. चेतन हा करी रोड येथील शिवकृपा इमारतीत राहणारा असून विठ्ठल सुके हा आरोपी शिवस्मृती इमारतीत राहणारा असल्याची माहिती एन. एम जोशी पोलिसांनी दिली आहे. एन. एम. जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रमोरे यांनी सांगितले की, जखमी चेतन आणि आरोपी विठ्ठल सुके यांच्यात जुने वाद होते. त्यामुळेच पूर्व वैमानस्यातून विठ्ठल सुके यांनी चाकूने चेतनच्या गळ्यावर वार केले. दोघांनाही अमली पदार्थाचे व्यसन असल्याची माहिती चंद्रमोरे यांनी दिली. फरार आरोपी विठ्ठल सुके याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.