मुंबई - मुंबई पोलिसांवर विश्वास नसलेल्या लोकांना व सुरक्षा दिली जात असेल तर, हे देशाचे दुर्दैव आहे. परंतु ज्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, हे सगळे महाराष्ट्रद्रोही आता देशभक्त झाले आहेत, अशी जहाल टीका राज्य मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपा सरकारवर केली आहे. कंगना ही सध्या भाजपाची पोपट झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि तिचे समर्थन करणारा भाजपा, यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा परिसरात माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना कंगना आणि भाजपावर टीका केली. ते म्हणाले, की कंगना ही सध्या भाजपाची पोपट झाली आहे. त्यामुळे भाजपला पूरक असलेली वक्तव्ये ती करत सुटली आहेत. यामुळेच भाजपाकडून आता तिला देशभक्त असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. मात्र ज्यांचा महाराष्ट्र आणि त्यांच्या पोलिसांवर विश्वास नाही, अशा लोकांना केंद्र सरकार वाय सुरक्षा देत असल्याने हे देशाचे दुर्दैव आहे.
हेही वाचा-कंगना रणौतला मोदी सरकार 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवणार ; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
भाजपा कंगना हिच्यावर खूप मेहरबानी करत आहे. ती येत्या काळात विधान परिषदेत अथवा राज्यसभेत दिसेल, असेही वडेट्टीवार म्हणाले. खरे तर, कंगना हिला पीओकेमध्ये जायचे होते. मात्र त्याच पीओकेचा विश्वास नसलेले हे देशभक्त असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
हेही वाचा-कंगनाला महाराष्ट्रातही सुरक्षा देणार हिमाचल प्रदेश पोलीस
दरम्यान, कंगना रणौतने मुंबईल पाकव्याप्तसारखे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कंगनाचा चांगलाच समाचार घेतला. राज्यभरात शिवसैनिकांनी कंगनाचा निषेध केला आहे.